सहकारातील एक वटवृक्ष कोसाळला , सिंदखेडराजा मतदार संघासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा
मा.मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना मातृशोक
साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस….
सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी तथा माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावती काकू शिंगणे यांची आज दुपारी ४:३० वाजता प्राणज्योत मालवली . त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पसरताच अनेकांच्या पापण्या ओलावल्या . त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भगीरथ सहकारी मिश्रखत कारखाना जिथे सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे चिरनिद्रा घेत आहे त्या समाधीस्थळ परिसरात होणार आहे .
शेंदुर्जन येथील राजघराणे कै संपतराव शिंगणे ऊर्फ पाहुणे यांच्या घराण्यात डोंगरशेवली येथील तालेवार सावळे परिवाराची लेकबाळ भरलेलं माप लवंडून तालेवार शिंगणे परिवाराची सुन म्हणून पदार्पण केले, भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी म्हणून वावरत असताना सामाजिक , राजकीय प्रवासाचे अनुभव त्यांना येऊ लागले . सहकारी जिल्हा बँकेत कै भास्करराव शिंगणे यांनी प्रशासकीय मॅनेजर म्हणून आपली सुरुवात केली . त्यानंतर देऊळगाव मही जिल्हा परिषद निवडणूक लढविली . जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला . जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली . आणि बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत राहिले . सहकारी बँकेचे शाखा विस्तार करीत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरण त्यांनी आखले . त्यातूनच सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी साखरखेर्डा येथे पैनगंगा सहकारी सुत गिरणी उभी केली . सुत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी १९९२ पर्यंत यशस्वी कारभार सांभाळला . बुलढाणा येथील भगिरथ सहकारी खत कारखाना उभा केला . येवढेच नाही तर सहकार क्षेत्रात काम करीत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी सुत गिरण्या , साखर कारखाने यांना बॅंकेंच्या माध्यमातून पतपुरवठा केला . १९८५ साली सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून भास्करराव शिंगणे यांनी निवडणूक लढविली आणि ते आमदार म्हणून निवडून आले . त्यावेळी काकुंनी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मतदार संघात प्रचारासाठी फिरल्या होत्या . प्रत्येक कामात काकूंनी साहेबांना साथ दिली . डोंगरशेवली माहेर असले तरी ते साळवे घराने सुध्दा राजकीय वारसा जोपासनारे होते . तोच वारसा काकूंनी पुढे सुरु ठेवला . मोठ्या साहेबानंतर राजकीय आणि सहकार क्षेत्रातील जबाबदारी डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यावर आली . डॉ राजेंद्र शिंगणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले . काकू संचालक म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या . सतत १५ वर्ष बॅंकेचे संचालकपद सांभाळीत असताना सिंदखेडराजा मतदारसंघातून डॉ राजेंद्र शिंगणे १९९५ साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आले . त्यानंतर १९९९ साली पुन्हा आमदार झाल्यानंतर त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली . २००० साली जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावतीकाकू शिंगणे यांनी यशस्वीपणे सांभाळली . राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांचा चाहता वर्ग खुपचं वाढला होता . सहकार महर्षी कै भास्करराव शिंगणे यांची कमतरता भासत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांना ती कधीही भासू दिली नाही . डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या डोक्यावर मायेचा हात कायम ठेवला . आज काकूंच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पसरताच अनेकांच्या शोक संवेदना उमटू लागल्या . सहकार क्षेत्रातील एक आधारवड कोसळल्याने मतदार संघात शोक व्यक्त केला जात आहे .






