- भारतीय संविधान जगण्याचा अधिकार प्रदान करते — तुषार राहिसा हंसदास
देऊळगाव राजा….
सध्याची परिस्थिती पाहता संविधानाचा आदर आणि जनजागृती होणे गरजेचे आहे कारण भारतीय संविधान आपल्याला जगण्याचा अधिकार प्रदान करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते तुषार राहिसा हंसदास यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयातील मराठी विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर अभियान अंतर्गत आपला प्राण : भारताचे संविधान या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी संजय झोटे, सेवानिवृत्त शिक्षक दीपक सत्यभान नागरे यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती.संविधान विषयक जनजागृतीपर विविध गिते तुषार यांनी सादर केली. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षात यासह न्याय, समता, स्वातंत्र्य,बंधुता या मूल्यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी देशातील बदलत्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. युवा पिढीने समाज घडविण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहनही डॉ. गोरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सीमा धुळे यांनी केले. प्रश्नोत्तर सत्रामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.






