देऊळगाव राजा :
यावर्षी पाऊस लवकर बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शहरातील नालेसफाई आतापर्यंत होणे आवश्यक होते. मात्र मान्सून तोंडावर आला असला तरी नालेसफाईला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वेळीच नालेसफाई न झाल्यास पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शहरात मान्सूनपूर्व साफसफाई मोहीम राबवावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना दिले आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा शहरात मान्सूनपूर्व साफसफाईकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर शहरातील अतिक्रमण पुन्हा डोके वर काढत आहे. शहरातील गटारी व नाल्या कचऱ्यांनी तुडुंब भरलेल्या असून, साचलेल्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील मध्यभागातून वाहत असलेल्या या नाल्यांमध्ये जागोजागी कचरा गाळ साचला आहे. पावसाळ्यात या नाल्यांना पूर येऊन रस्त्यावर पाणी साचते.
नाल्यांमधून पाणी वाहने बंद झाल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्याकडून “स्वच्छ भारत अभियान” प्रभावीने राबविल्या जात नाही. शहरात स्वच्छता अभियानाला धुळीस मिळवून तिलांजली देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व साफसफाईसह अन्य समस्यांकडे पाठ फिरवणाऱ्या पालिका प्रशासनाने जागृत होऊन शहरातील समस्याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,शहरध्यक्ष विजय खांडेभराड, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, ऍड. अर्पित मीनासे,युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड,प. स. माजी सभापती हरीश शेटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे,गजानन पवार, महेश देशमुख, राष्ट्रवादी नेते विलास खराट, विजू पाटील,आदींनी केली आहे.