माजी आमदार तोताराम कांयदे यांचा पुढाकार – एक महिन्याची पेन्शन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी
देऊळगाव राजा…… दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२५
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत माजी आमदार तोताराम कांयदे यांनी एक अत्यंत उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. राज्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी आपल्या एक महिन्याची आमदार पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून दिली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत श्री. कांयदे यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकार घेतला आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना माजी आमदार कांयदे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून माझा नैतिक धर्म आहे. संकटाच्या वेळी शासनाबरोबर जनतेनंही पुढे यायला हवं, म्हणून मी ही छोटीशी मदत देत आहे.”
त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, इतर लोकप्रतिनिधींनीही अशाच प्रकारे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






