देऊळगावराजा :
प्रधानमंत्री योजनेअंतर्गत शहरात घरकुलाचे बांधकामे सुरू आहे.मात्र घरकुल योजनेचे अनुदान थकल्याने अनेक लाभार्थ्यांची बांधकामे रखडले असून लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. घरकुल योजनेचे रखडलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या वितरीत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने मुख्याधिकारी अरुण मोकळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिऱ्यांनी घरकुल योजनेचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना सोबत घेऊन पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान घरकुल योजनेचे थकीत अनुदान जमा करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात शेकडो घरकुलांना मान्यता मिळाली. लाभार्थ्यांना पहिला हप्ता वेळेत वितरित करण्यात आला. त्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे बांधकाम सुरू केले.मात्र तीन महिने होऊनही लाभार्थ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहे.
स्वतःचे घर असावे हे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र पैशाअभावी अनेकांच्या घराची स्वप्न अधुरे राहते.अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने मार्फत घरकुलाचा लाभ दिला जातो. त्यातही अपुरे अनुदान असून तेही वेळेवर मिळत नसल्याने देऊळगाव राजा शहरातील जवळपास 120 लाभार्थ्यांची घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. परिणामी वेळेत घरकुल पूर्ण होत नसल्याने लाभार्थी नाराज होत आहे.
शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेचे थकीत अनुदान तत्काळ लाभार्थ्यांच्या वितरीत करावे,अशी मागणी लाभार्थ्यांसह राष्ट्रवादीची तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश सवडे,गणेश बुरकुल,माजी नगरसेवक करीम भाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, महेश देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विलास खराट, शब्बीर खान, शरद तळेकर,शे.राजू आदींनी केली आहे.